इतर

शिंदीतील २२ वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान मृत्यू

शिंदीतील २२ वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ तालुक्यातील शिंदी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, २२ वर्षीय आकाश अशोक चव्हाण या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रारंभी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आकाश चव्हाण (वय २२) हा आपल्या आई, लहान बहीण आणि आजोबांसह शिंदी येथे वास्तव्यास होता. त्याची आई हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, तर बहीण शिक्षण घेत होती. आकाश शिक्षणासोबतच पुण्यात काम करून आर्थिक मदत करत होता. काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे त्याने विष प्राशन केले होते. त्यानंतर त्याला तत्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रविवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आकाशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button