इतर

पिंपळगाव गोलाईत गावाजवळ ”द बर्निंग बस’चा थरार 

पिंपळगाव गोलाईत गावाजवळ ”द बर्निंग बस’चा थरार 

बस संपूर्ण जळून खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

जामनेर प्रतिनिधी l 

पुण्याहून धारणीकडे निघालेली खासगी लक्झरी बस (क्रमांक MP 48 ZF 5533) मंगळवारी सकाळी पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. बसच्या मागील टायरमधून सुरू झालेल्या आगीत क्षणार्धात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस पुणे येथून बऱ्हाणपूरमार्गे धारणीकडे जात असताना पिंपळगाव गोलाईतजवळ मागील टायर अचानक तापून पेट घेतला. आग पाहून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह बाहेर काढले. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.

या वेळी जोरदार वारा असल्याने आगीने अधिक रौद्र रूप धारण केले होते. आगीची माहिती मिळताच जामनेर नगरपालिकेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यानंतर शेंदुर्णी येथील अग्निशमन वाहनानेही मदतीसाठी धाव घेतली.

या बसमध्ये महिला, मुले, तरुण तसेच वृद्ध प्रवासी होते. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चालक आणि वाहकाचेही काहीही बिघडले नाही, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर पहूर-जामनेर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पहूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच आणि ग्रामस्थांनी मिळून आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

  1. या घटनेने चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत असून, नागरिकांनीही वेळेवर दाखवलेल्या मदतीमुळे एक मोठा अपघात टळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button