दारूसाठी पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला; डोक्यात लोखंडी पट्टीने मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला; डोक्यात लोखंडी पट्टीने मारहाण
जळगाव | प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने भाजी विक्रेत्याच्या डोक्यात लोखंडी पट्टीने जोरदार वार करत गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (१० जून) रात्री जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात घडली. या हल्ल्यात पीडिताच्या डोक्याला तब्बल १२ टाके पडले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर ज्ञानेश्वर गायकवाड (वय ५०, रा. बळीराम पेठ) हे परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करून साहित्य आवरत असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने गायकवाड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
नकाराचा राग आल्याने त्या व्यक्तीने जवळच ठेवलेली लोखंडी पट्टी उचलून थेट गायकवाड यांच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला १२ टाके टाकले असून, प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेनंतर किशोर गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे बळीराम पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.