जळगाव बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरणारा मालेगावचा चोरटा अटकेत; चार मोबाईल हस्तगत

जळगाव बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरणारा मालेगावचा चोरटा अटकेत; चार मोबाईल हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील नवीन बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी रेल्वे पोलीस दलाच्या मदतीने अटक केली. शेख इम्रान शेख गुफरान (वय २२, रा. गुलशन नगर, मालेगाव) असे अटकेत असलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरी केलेले चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याचा साथीदार सोनू हा घटनास्थळावरून फरार झाला.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मोबाईल चोरीप्रकरणी विशेष गस्तीसाठी पथक तयार केले होते. यामध्ये पोहेकॉ. नरेश सोनवणे, पोहेकॉ. मिलिंद सोनवणे, पोकॉ. राहुल पाटील व नरेंद्र दिवेकर यांचा समावेश होता.
गस्तीदरम्यान पोलिसांनी बसस्थानक परिसरात दोन संशयितांना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने शेख इम्रान याला प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर अटक करण्यात आली.
चौकशीत त्याने साथीदार सोनूसह बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
