कजगाव – गोंडगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीच्या घरी आज आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिली व परिवाराचे सांत्वन केले. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील आदी उपस्थित होते.
पीडित बालिकेचे वडील दिव्यांग आहेत. घर देखील लाकडी फळ्या लावलेले पत्र्याचे असून अतिशय साधारण अशी आर्थिक परिस्थिती त्यांची आहे. छोटीशी टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला आमदार मंगेश चव्हाण यांनी १ लाख रुपयांची आर्थिक मदत यावेळी सुपूर्द केली. तसेच शासनाच्या माध्यमातून सदर कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच आरोपी वरील खटला फास्टट्रॅक कोर्टात सुरू करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.
अतिशय दुर्दैवी अश्या या घटनेने समाजमन ढवळून निघाले असून सर्वांनीच याची गंभीर दखल घेतली आहे. मी पीडितेच्या घरी असतानाच भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी देखील माझ्याशी फोनवर संपर्क करून घटनेची माहिती घेतली तसेच दोन दिवसात या कुटुंबियांना भेट देणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
अश्या घटना का घडतात ? समाजात अश्या विकृत मानसिकता का फोफावत आहे याचा देखील गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या घटना रोखणे ही आता कायद्यासोबतच सामाजिक जबाबदारी देखील बनली असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.