इतर

खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू : विद्यानगर परिसरात शोककळा

खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू : विद्यानगर परिसरात शोककळा

जळगाव प्रतिनिधी : शहरातील विद्यानगर भागात सोमवारी (७ जुलै) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेळताना गळफास लागल्याने हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १२) या मुलाचा करुण अंत झाला. या घटनेमुळे अहिरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीपकुमार अहिरे हे विद्यानगरात कुटुंबासह वास्तव्यास असून, रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये पुणे येथील एका संस्थेमधून त्यांनी हार्दिकला ९ महिन्यांचा असताना दत्तक घेतले होते. हार्दिक त्यांच्या कुटुंबाचा आनंदाचा केंद्रबिंदू होता.

सोमवारी दुपारी हार्दिक शाळेतून परतल्यानंतर चहा-बिस्किटे खाल्ली आणि आई लहान भावाला ट्युशनला सोडण्यासाठी बाहेर गेली. यानंतर हार्दिक शेजारील पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळण्यासाठी गेला. तेथे खेळताना छताला लावलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्यात अडकला आणि ही दुर्दैवी घटना घडली. त्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.

काही वेळाने, परदेशी यांच्या घरात राहणाऱ्या एका महिलेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. माहिती मिळताच हार्दिकच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. हार्दिकला तातडीने खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात आणि शाळकरी मित्रमंडळींमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अहिरे कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button