सोने दरात १२०० रुपयांची घसरण; आठ दिवसांनी दर १ लाखांच्या खाली

जळगाव (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सतत चढ-उतार अनुभवत असलेल्या सोन्याच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा घसरण नोंदवली गेली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर तब्बल १२०० रुपयांनी घसरून तो ९६,३०० रुपयांवर (GSTसह ९९,१८९) पोहोचला आहे. यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला असून, आठ दिवसांनंतर सोन्याचा दर पुन्हा १ लाखांच्या खाली गेला आहे.
टेरिफ धोरणाचा परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला नाही
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील ट्रम्प सरकारने नवीन टेरिफ धोरण जाहीर केले होते. या घोषणेनंतर सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अपेक्षेच्या उलट परिणाम दिसून आला. मंगळवारी सोन्याचा दर ९७,५०० (GSTसह १,००,४२५) रुपये होता, जो बुधवारी १२०० रुपयांनी घसरला.
चांदीच्या दरात स्थिरता
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या चांदीचा दर १ किलोसाठी १,०८,००० रुपये इतकाच कायम आहे.
श्रावणात खरेदीसाठी संधी
दरम्यान, श्रावण महिन्याला १० जुलैपासून सुरुवात होत असल्यामुळे पारंपरिक खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी सोन्याचा दर घसरल्याने खरेदीदारांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते, असे स्थानिक सराफ व्यावसायिकांचे मत आहे.
