इतर

भुसावळमध्ये बनावट घरफोडीचा प्रकार उघडकीस : जुगाराच्या नशेत महिलेने हरवले पैसे, पोलिसांनी उघडकीस आणला बनाव

भुसावळमध्ये बनावट घरफोडीचा प्रकार उघडकीस : जुगाराच्या नशेत महिलेने हरवले पैसे, पोलिसांनी उघडकीस आणला बनाव

भुसावळ (प्रतिनिधी) : जुगाराच्या आहारी गेलेल्या भुसावळ येथील एका महिलेने कर्जबाजारी होऊन स्वतःच घरातील रोख रक्कम आणि दागिने गमावले. त्यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव रचून पोलिसांत खोटा गुन्हा नोंदविला. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाच्या सखोल तपासातून हा प्रकार उघडकीस आला असून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल
दि. १० जून रोजी भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी भागातील एका घरात दुपारच्या सुमारास घरफोडी झाली असून चोरट्यांनी रोकड व दागिने चोरून नेल्याची तक्रार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीसाठी जळगाव येथील एलसीबी पथक घटनास्थळी पोहोचले असता काही संशयास्पद बाबी त्यांच्या लक्षात आल्या. घराच्या शेजारील घर गेल्या १० दिवसांपासून बंद असूनही तेथे कोणतीही चोरी झालेली नव्हती. तसेच संबंधित घराचे कुलूपदेखील सुरक्षित होते.

जुगाराचे व्यसन ठरले सर्व अनर्थाचे कारण
एलसीबी पथकाने या घटनेतील फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी केली असता, फिर्यादीची आई शर्मिला चंद्रमणी शिंदे (वय ४९, रा. आर.बी.-२/९५२, नॉर्थ कॉलनी, लिम्पस क्लब, भुसावळ) हिला जुगार खेळण्याचे व्यसन असल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी घरातील रोख रक्कम तसेच सावकाराकडून घेतलेली रक्कम जुगारात गमावली होती. जिंकण्याच्या मोहात त्यांनी स्वतःचे आणि मुलाचे सोन्याचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत तारण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेतले होते. या कर्जाची रक्कमदेखील त्यांनी जुगार खेळण्यासाठी वापरल्याचे त्यांनी तपासात कबूल केले.

बनावाच्या कागदपत्रांसह पोलिसांकडून पुरावे हस्तगत
पोलिसांनी बँकेकडून सदर दागिन्यांची तारण पावती मिळवून या कथित घरफोडीचा खोटा बनाव असल्याचे स्पष्ट केले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने अत्यंत कौशल्याने ही गुन्ह्याची उकल केली. त्यानुसार शर्मिला शिंदे यांना संशयित आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले.

तपास यशस्वी करणाऱ्या पथकात यांचा सहभाग
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. संदीप चव्हाण आणि चा.पो.कॉ. महेश सोमवंशी यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button