राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे पर्यावरणपूरक सत्कार;

राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे पर्यावरणपूरक सत्कार;
जळगाव (दि. १ जुलै २०२५):राष्ट्रीय डॉक्टर दिवसाचे औचित्य साधून गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने मंगळवारी जळगावमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सचा पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात डॉक्टरांना तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, उपअधीष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. रमेश वासनिक, डॉ. कपिल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. सुशांत सुपे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करून करण्यात आली.
हा सत्कार गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पाठवलेला संदेशही शिवाजी पाटील यांनी सर्व उपस्थित डॉक्टरांना वाचून दाखवला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वैद्यकीय व्यावसायिकांचा गौरव केल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे आयोजन कौतुकास्पद ठरले.