टवाळखोरीला विरोध केल्याने वृद्धेचा निर्घृण खून करणारे तिघे ४८ तासांत जेरबंद !

टवाळखोरीला विरोध केल्याने वृद्धेचा निर्घृण खून करणारे तिघे ४८ तासांत जेरबंद !
एलसीबी आणि पिंपळगाव हरे. पोलिसांची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी): टिंगल-टवाळ्या करणाऱ्या टवाळखोरांना खडसावणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धेचा त्यांच्या राहत्या घरातच निर्घृण खून करून, तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडून अज्ञातांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना पाच जून रोजी शेवाळे (ता. पाचोरा) येथे घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती.
मात्र केवळ ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या संयुक्त पथकाने या घटनेचा तपास उलगडत तीन संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी साहिल मुकद्दर तडवी (२१), राकेश बळीराम हातागडे (२१) आणि राजेश अनिल हातागडे (१८) हे तिघेही शेवाळे गावचे रहिवासी आहेत.
गुरुवारी (५ जून) रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास जनाबाई महारू पाटील (वय ८५, रा. शेवाळे) या वृद्ध महिलेला त्यांच्या राहत्या घरात अज्ञातांनी पाठीमागच्या दरवाजातून घुसून, डोक्यात तीव्र हत्याराने घाव घालून ठार मारले. खून केल्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने आरोपींनी चोरून नेले होते.
जनाबाई पाटील यांचे मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १०३(१), ३११, ३३२अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबी आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना विशेष तपासाचे आदेश दिले. पीआय संदीप पाटील (एलसीबी) व एपीआय प्रकाश काळे (पिंपळगाव हरेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गावात गोपनीय माहिती संकलन सुरू केले.
संशयितांविषयी माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासात तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी जनाबाई यांच्या घरासमोर नियमित बसत असत व टिंगल-टवाळी करीत. यामुळे त्यांनी त्यांना सुनावले होते. याच रागातून आरोपींनी खून व चोरीचा कट रचल्याचे समोर आले.
खून आणि चोरीची योजना:
५ जूनच्या रात्री तिघांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश करून टणक हत्याराने जनाबाई पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या कानातील दागिने ओरबडून अंधारात पलायन केले.
कारवाईतील अधिकारी व पथक:
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि. प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, सागर पाटील यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे: एपीआय प्रकाश काळे, पीएसआय शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय प्रकाश काळे करीत आहेत.