इतर

सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला चुना फासून निषेध

सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला चुना फासून निषेध
जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन ; राजीनाम्याची मागणी
जळगाव – विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाइन पत्ते खेळत असल्याचा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना, जळगावमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने तीव्र आंदोलन छेडले असून, मंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला चुना फासून राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी महायुतीतील अजित पवार गटाचे नेते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम व हनी ट्रॅप प्रकरणातील भाजप आमदार प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमांनाही चुना फासून निषेध व्यक्त करण्यात आला.

शेतकरी दररोज आत्महत्या करत असताना मंत्री मात्र सभागृहात पत्ते खेळण्यात गर्क असल्याची टीका करताना, “शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, भावफरक यांचा मंत्र्यांना विसर पडला आहे,” असे प्रा. सोनवणे म्हणाले. त्याचबरोबर “आईच्या नावावर डान्सबार चालवणारे गृहराज्यमंत्री व हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले आमदार यांच्यावरही सरकारने कारवाई केली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या आंदोलनात प्रमोद घुगे, अशोक सोनवणे, किरण ठाकूर, लोटन सोनावणे, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button