विविध मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन
जळगाव प्रतिनिधी lराज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज, मंगळवार, १ जुलै २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार कुशल दर्जाचे वेतन, भत्ते, जादा कामाचा मोबदला, कायदेशीर रजा आणि इतर सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.
राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यापूर्वी १३ मे २०२५ रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनात प्रशासनाने आश्वासने दिली होती. मात्र, त्यानंतर चालकांच्या मागण्यांबाबत प्रशासन किंवा पुरवठादारांकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप १०८ रुग्णवाहिका चालक युनियनने केला आहे.
चालकांनी १५ जूनपर्यंत मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली होती. तरीही ३० जूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने, युनियनने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे १०८ रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होण्याची भीती आहे, ज्याचा थेट परिणाम राज्यातील आरोग्यसेवेवर होऊ शकतो.
चालक युनियनने शासन आणि पुरवठादारांना तातडीने मागण्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे.