जळगावात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रंगेहाथ लाच घेताना अटकेत

जळगावात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रंगेहाथ लाच घेताना अटकेत
१० हजाराची मागणी, ५ हजार घेताना सापळा यशस्वी
जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना पगाराच्या बिलावर सह्या करून देण्यासाठी लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांनी तक्रारदाराकडे एकूण १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव येथील शासकीय दिव्यांग समिश्र केंद्रात प्रभारी अधीक्षक (वर्ग-२) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पगार बिलासंबंधी कामासाठी दिनांक १४ जुलै रोजी जिल्हा दिव्यांग विभागात भेट दिली असता, श्रीमती माधुरी भागवत यांनी कोणतीही त्रुटी नसलेल्या बिलावर सह्या करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम १० हजारांवर आली व त्यातील ५ हजार रुपये प्रथम हप्त्याच्या स्वरूपात देण्याची मागणी त्यांनी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार २२ जुलै रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. २४ जुलै रोजी सापळा कारवाई दरम्यान, श्रीमती माधुरी भागवत यांनी ५ हजार रुपये लाच रक्कम तक्रारदाराकडून स्विकारली. ही रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत GPSI सुरेश पाटील, पोहेकाँ शैला धनगर, पोकाँ प्रणेश ठाकूर व सचिन चाटे सहभागी होते.
अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मा. भारत तांगडे व अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लाच मागणाऱ्यांविरोधात त्वरित तक्रार करण्याचे आवाहन
एसीबीकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा.
दूरध्वनी : ०२५७-२२३५४७७ | टोल फ्री क्रमांक : १०६४
