‘माझी लाडकी बहीण’ योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘माझी लाडकी बहीण’ योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनीही लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले असून, यामुळे राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरव्यवहारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीचे आदेश दिले आहेत. तसेच योजनेतील पात्रता निकषांची अधिक चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देशही मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले.
दरम्यान, या योजनेतील अनियमिततेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात तब्बल ४,८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. “घोटाळा नेमका कुणी केला?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
२६ लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी
माहिती तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, योजनेतील २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असूनही लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये काही पुरुष लाभार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या घरी महिलांचे बँक खाते नसेल किंवा महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले असतील का, याची चौकशी केली जात आहे. दोषी आढळल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आदिती तटकरे यांचा इशारा
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही कठोर भूमिका घेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “शासन दिशाभूल करणाऱ्यांकडून रक्कम वसूल करेल,” असे स्पष्ट करत त्यांनी विभागाकडून सुधारणा व चौकशी प्रक्रियेतील कार्यवाही वेगाने सुरू असल्याचे सांगितले.
योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत असताना मोठ्या प्रमाणावर लाभाच्या गैरवापराची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे शासनाच्या योजनांची पारदर्शकता आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





