हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बोदवड (जि. जळगाव) : तलवार व कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात सण-उत्सवाच्या काळात मिश्र वस्ती असलेल्या भागांमध्ये काही समाजकंटकांकडून शस्त्रांद्वारे अनुशासन बिघडवण्याचा धोका असतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले होते.
गोपनीय माहितीवरून तात्काळ कारवाई
दिनांक ०९ जून २०२५ रोजी पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बोदवड ते शेलवड मार्गावर, तसेच महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन या दिशेने एक इसम हातात तलवार आणि कोयता घेऊन फिरत आहे व दहशत निर्माण करत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. प्रितम पाटील आणि पो. अं. रविंद्र चौधरी यांचे पथक त्वरित कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
दहशत माजवणारा इसम अखेर ताब्यात
पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन शोधमोहीम सुरू केली असता, पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय २६, रा. माळी वाडा, बोदवड) हा तलवार व कोयता हातात घेऊन परिसरात फिरताना आढळला. तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण ₹४,५००/- किंमतीचे तलवार व कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध बोदवड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०६/२०२५ अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.