खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

नशिराबादच्या उर्दू शाळेत केवळ ५ शिक्षक; ४१५ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

नशिराबादच्या उर्दू शाळेत केवळ ५ शिक्षक; ४१५ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

अध्यक्ष-चेअरमनमधील वादामुळे शिक्षक भरती थांबली; उपाध्यक्षांचे पालकमंत्र्यांकडे साकडे

नशिराबाद  नशिराबाद येथील केएसटी उर्दू माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. १९७८ पासून सुरू असलेल्या या मान्यताप्राप्त शाळेत एकूण १० शिक्षकांची पदे मंजूर असताना, केवळ ५ शिक्षकांवरच आठ वर्ग चालवले जात आहेत. यामुळे ४१५ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, संस्थेचे उपाध्यक्ष असलम तनवीर यांनी याबाबत शिक्षण विभाग तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
तक्रारीनुसार, शाळेत आठवीचे तीन, नववीचे तीन आणि दहावीचे दोन असे एकूण आठ वर्ग आहेत. यामध्ये २२६ मुली आणि १८९ मुलांचा समावेश असून, एकूण ४१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलींची संख्या जास्त असतानाही, २०१५ नंतर शाळेत एकही महिला शिक्षक नाही. दोन महिला उपशिक्षिका निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी भरती झालेली नाही, ज्यामुळे विशेषतः मुलींची मोठी गैरसोय होत आहे.

मुख्याध्यापक पदही रिक्त
शाळेत मंजूर असलेल्या ९ उपशिक्षक आणि १ मुख्याध्यापक या १० पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. २०१८ पासून शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही. तसेच, क्रीडा शिक्षकाने ‘व्हीआरएस’ घेतला असून, एक शिक्षक न्यायालयीन प्रकरणामुळे गैरहजर आहे. यामुळे पाच शिक्षकांच्या भरवशावर संपूर्ण शाळा चालत आहे.

अध्यक्ष-चेअरमनमधील वाद कारणीभूत
असलम तनवीर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शाळेच्या व्यवस्थापन समितीमधील अध्यक्ष आणि चेअरमन यांच्यातील अंतर्गत वादामुळे शिक्षक भरती थांबली आहे. या वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी शिक्षण विभागाला यात वेळीच लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच, त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या शाळेच्या दुर्दशेवर सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button