खान्देशगुन्हेजळगांव

जगन्नाथ पुरीत सापडला भुसावळचा तरुण, पोलिसांच्या अथक तपासाला यश

जगन्नाथ पुरीत सापडला भुसावळचा तरुण, पोलिसांच्या अथक तपासाला यश

जळगाव (प्रतिनिधी) : तब्बल दोन महिने बेपत्ता झालेल्या भुसावळ येथील १८ वर्षीय तरुणाचा नशिराबाद पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने शोध लावून तो सुखरूप पालकांच्या स्वाधीन  केला आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.

मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद
जय संजयकुमार जावरे (वय १८ वर्ष ३ महिने, रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) हा दि. १७ जुलै रोजी कोणालाही काही न सांगता नशिराबाद येथून निघून गेला होता. त्याबाबत मिसिंग रजिस्टर क्र. २५/२०२५ प्रमाणे १८ जुलै रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलाचा मोबाईल फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

तपास पथकाची धडपड
सहा. पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेश मेंढे, कमलाकर बागुल, प्रशांत विरणारे व प्रकाश कोळी यांचे तपासपथक नेमण्यात आले. धागादोरा नसतानाही या पथकाने मुलाचे बँक व्यवहार तपासले असता त्यावरून तो ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे असल्याचा सुराग मिळाला.

सायबर पोलिसांची मदत
सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार शिवनारायण देशमुख, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे व दीपक सोनवणे यांच्या मदतीने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर तपास पथक थेट जगन्नाथ पुरी येथे गेले. दोन दिवस अथक प्रयत्न करून अखेर बेपत्ता मुलगा शोधून काढण्यात आला.

सुखरूप पालकांच्या स्वाधीन
दि. २० सप्टेंबर रोजी, जवळपास दोन महिन्यांनंतर जय याला सुखरूप जळगावला आणून त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

वरिष्ठांकडून कौतुक
या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी नशिराबाद पोलिसांचे व तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button