पाकिस्तानची संसद बरखास्त ; काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक होणार
इस्लामाबाद ;- संपूर्ण देश साखरझोपेत असताना पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली असून यामुळे पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने आता येथे काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक करण्यात येणार आहे.
संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार होता. त्यानंतर, सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तानात घेण्यात येणार होत्या. परंतु, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने निवडणुका होईपर्यंत देशावर नियंत्रण ठेवण्याकरता काळजीवाहू प्रशासनाची निवड केली जाणार आहे. तसंच, येत्या ९० दिवसांत निवडणुका घेता याव्यात याकरता संसदेत विरोधी पक्षनेताही निवडला जाणार आहे.