
मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल पुरवठा करणारे रॅकेट उघड; सात जणांना अटक
जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; ८ पिस्टल, १० जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी असा एकूण सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३/२५ अन्वये १ मार्च २०२६ रोजी पहाटे १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तपास सुरू केला. यामध्ये यश रामदास नन्नवरे (वय २७, रा. धनगर बिल्डिंग, इंडिया गॅरेज जवळ, जळगाव) हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भज्जी गल्ली परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हे पिस्टल केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी केशव भालेराव यालाही ताब्यात घेतले. चौकशीत त्याने समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून दोन पिस्टल विकत घेतल्याचे सांगितले असून त्यातील एक यश नन्नवरे तर दुसरे गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा, जळगाव) याला विकल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याचा शोध घेतला असता तो नेरी (ता. जामनेर) येथे असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली. त्याने जिल्ह्यातील विविध व्यक्तींना पिस्टल विकल्याची माहिती पोलिसांना दिली.
या तपासादरम्यान पोलिसांनी केशव सुनील भालेराव (वरणगाव), यश रामदास नन्नवरे (जळगाव), गौरव देविदास साळवे (पिंप्राळा, जळगाव), समाधान बळीराम निकम (अंजाळे, ता. यावल), विकास प्रकाश काकडे (रा. साळसिंगी, ता. बोदवड), जगदीश गजानन महाजन (रा. बंबाळा फाटा, शाहपूर, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) आणि कैलास राजेंद्र माळी (रा. बोरकुंड, जि. धुळे) अशा सात आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत आरोपींकडून एकूण ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे तसेच होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्र. एमएच-१९ सीएम १३१२) असा सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तीन जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आरोपी समाधान निकम हा पाचोरा पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार होता. तसेच तो यावल पोलिस ठाण्यातील आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातही हवा होता. आरोपी केशव भालेराव हाही वरणगाव पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात हवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.




