राजकीय

फैजपूर नगरपरिषदेच्या शिक्षण कर आकारणीवर प्रश्नचिन्ह!

फैजपूर नगरपरिषदेच्या शिक्षण कर आकारणीवर प्रश्नचिन्ह!

शिक्षण कराच्या नावाखाली नागरिकांकडून वसुली; कायदेशीर आधार स्पष्ट करण्याची माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांची मागणी

फैजपूर l फैजपूर नगरपरिषदेकडून नागरिकांच्या मालमत्ता कर बिलामध्ये शिक्षण कराच्या नावाखाली जादा रक्कम आकारली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या कर आकारणीची कायदेशीर तरतूद काय आहे, तसेच कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे ही वसुली केली जात आहे, याचा लेखी खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा फैजपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात शिक्षण कर कोणत्या कायद्याच्या कलमांतर्गत आकारला जातो, त्यासाठी कोणता शासन निर्णय किंवा प्रशासकीय आदेश लागू आहे, कर किती टक्के दराने आकारला जातो आणि या करातून जमा होणारी रक्कम कोणत्या शैक्षणिक कामांसाठी वापरली जाते, याची माहिती मागविण्यात आली आहे.
तसेच, आजपर्यंत नागरिकांकडून शिक्षण करापोटी किती रक्कम वसूल करण्यात आली, याचाही तपशील देण्याची मागणी करण्यात आली आहे. या कर आकारणीसाठी नगरपरिषद सभेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

कर आकारणी कायदेशीर तरतुदींनुसार होत आहे की नाही, याची सखोल चौकशी करून लेखी खुलासा द्यावा. जर कर आकारणीला कायदेशीर आधार नसेल, तर नागरिकांकडून होणारी वसुली थांबवून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शेख कुर्बान शेख करीम यांनी केली आहे.
आता फैजपूर नगरपरिषद प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन काय भूमिका मांडते आणि शिक्षण कराच्या आकारणीबाबत कोणता खुलासा करते, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button