खोट्या लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलनच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक वाढली
जळगाव | प्रतिनिधी : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलनच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा
वाहन नोंदणीसाठी VAHAN, ड्रायव्हिंग लायसन्स सेवांसाठी SARATHI, तसेच परिवहन सेवांसाठी Parivahan या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. तसेच ई-चलन भरण्यासाठीही अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करणे आवश्यक आहे. या सर्व संकेतस्थळांचा शेवट gov.in या अधिकृत डोमेनने होत असल्याने नागरिकांनी याची खात्री करूनच व्यवहार करावेत.
संशयास्पद लिंक टाळा
.com, .online, .site, .in अशा डोमेन असलेल्या संशयास्पद संकेतस्थळांवर वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील भरू नयेत. तसेच परिवहन विभाग किंवा RTO कडून व्हॉट्सअॅपद्वारे कोणतीही पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. संशयास्पद लिंक किंवा APK अॅप्स डाउनलोड करण्यापासूनही दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणुकीचा संशय आल्यास तक्रार करा
ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यातही तक्रार करता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिली आहे.





