
‘लाडकी बहीण’ योजनेत १.०५ कोटी महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता; रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
निवडणुकीवेळी सर्वांना लाभ, आता पडताळणीत महिलांना वगळले जात असल्याचा आरोप
मुंबई | प्रतिनिधी : राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. मात्र योजनेच्या सध्या सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेत सुमारे १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, विधिमंडळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असताना सरकारकडून तब्बल १.०५ कोटी ‘लाडक्या बहिणींना’ अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा मोठा दुटप्पीपणा असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू करताना परिस्थिती काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सध्या संभाव्य पात्र लाभार्थींची संख्या सुमारे १ कोटी ४८ लाख ६० हजार इतकी शिल्लक राहण्याची शक्यता असून, २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी २६ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात शासनाने सर्व महिलांना पैसे दिले, मात्र निवडणुका जिंकल्यानंतर हळूहळू ‘लाडक्या बहिणीं’वरील प्रेम कमी होत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.
सरकारच्या या भूमिकेवर टीका करत त्यांनी “अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता” अशा शब्दांत संताप व्यक्त केला असून, या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये नाराजी पसरल्याचे त्यांनी म्हटले आहे.





