खान्देशगुन्हेजळगांव

वडिलांवरील मारहाणीचा बदला; मुलाकडून भरदिवसा दोन राऊंड गोळीबार

वडिलांवरील मारहाणीचा बदला; मुलाकडून भरदिवसा दोन राऊंड गोळीबार

घरकुल चौक परिसरात खळबळ; मुख्य संशयित फरार, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

जळगाव | प्रतिनिधी : शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी दुपारी भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडल्याने घरकुल चौक परिसरात एकच खळबळ उडाली. वडिलांना झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने मुलाने गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम चौकातील रहिवासी रसाल राठोड (वय ४८) हे मंगळवारी दुपारी नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी झाल्यानंतर रसाल राठोड यांनी तातडीने आपल्या मुलगा अनिल राठोड याला याबाबत माहिती दिली.
वडिलांना मारहाण झाल्याचे कळताच संतापलेल्या अनिल राठोडने दुचाकीने घटनास्थळ गाठले. घरकुल चौक परिसरात त्याला वडिलांना मारहाण करणारे संशयित बसलेले दिसताच त्याने कंबरेला असलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या दिशेने दोन राऊंड गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच पळापळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील तीन जणांना ताब्यात घेतले असून प्रशांत चौधरी, हिमांशु शुक्ला, कृष्णा सूर्यवंशी आणि अक्षय तायडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, गोळीबार करून फरार झालेला मुख्य संशयित अनिल राठोड याचा पोलिसांकडून शोध सुरू असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button