खान्देशजळगांव

जळगावात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांना मनपाचा दणका; दोन क्लासेसना १ लाख २० हजारांचा दंड

जळगावात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांना मनपाचा दणका; दोन क्लासेसना १ लाख २० हजारांचा दंड

​जळगाव: प्रतिनिधी जळगाव शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बॅनर व स्टिकर्सवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. मू.जे. महाविद्यालय परिसरातील विनापरवाना फलकबाजी महापालिकेने गांभीर्याने घेतली असून, दोन खाजगी क्लासेसना प्रत्येकी ६० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख २० हजार रुपयांचा दंडाचा बडगा उगारला आहे. मनपाच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​अग्रवाल चौक ते मू.जे. महाविद्यालय या परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट झाला होता. यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होत होतेच, शिवाय वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. बुधवारी सकाळी मनपाच्या पथकाने या भागात विशेष मोहीम राबवून सुमारे ६० मोठे बॅनर जप्त केले. केवळ मोठे फलकच नव्हे, तर सार्वजनिक भिंती आणि खांबांवर हजारोच्या संख्येने स्टिकर्स लावून विद्रुपीकरण केल्याबद्दल ‘डंबेलकर’ आणि ‘पेस अकॅडमी’ या दोन क्लासेसना प्रत्येकी ६० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

​महापालिकेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शहरातील काही संस्थांनी स्वतःहून आपले अनधिकृत फलक काढण्यास सुरुवात केली आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून, विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button