इतर

फैजपूरमध्ये अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!

फैजपूरमध्ये अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!

श्रीराम टॉकीज परिसरातील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी

फैजपूर : शहरातील श्रीराम टॉकीज परिसरातील धाडी नदी लगत असलेल्या नगरपरिषदेच्या जागेवरील कथित अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम यांनी फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी व नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, श्रीराम टॉकीज परिसरातील नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून, परिसरात काही व्यापाऱ्यांकडून अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामे उभारण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत आणि सातबारा उताऱ्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाच प्रमुख मागण्या मांडल्या
१. संबंधित जागेची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अतिक्रमणाची खात्री करावी.
२. जागेच्या मालकी हक्काची, सातबारा उताऱ्याची आणि संबंधित शासकीय अभिलेखांची तपासणी करावी.
३. जागा शासकीय मालकीची किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव असल्यास अनधिकृत बांधकामांविरोधात नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करावी.
४. अतिक्रमणामुळे सार्वजनिक हिताला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
५. करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल आणि कारवाईची माहिती अर्जदाराला लेखी स्वरूपात द्यावी.

नगरपरिषदेच्या भूमिकेकडे लक्ष
शहरातील सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आता या तक्रारीवर फैजपूर नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष चौकशीनंतर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button