खान्देशजळगांवसामाजिक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांना दिलासा

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांना दिलासा

सोनं अडीच हजारांनी तर चांदी तब्बल २० हजारांनी स्वस्त

जळगाव : केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारातून आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे.

सराफ बाजारात सोन्याच्या दरात सुमारे अडीच हजार रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. या दरकपातीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरघसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६२ हजार २२५ रुपये, तर चांदीचा दर २ लाख ७३ हजार ९८० रुपयांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी दर प्रचंड वाढल्याने बाजारातील ग्राहकसंख्या कमी झाली होती. मात्र, अचानक झालेल्या या घसरणीमुळे पुन्हा एकदा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः महिला ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

सराफ व्यावसायिकांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी करून कच्च्या तेलाच्या बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा बाहेर पडल्याने या धातूंच्या दरात घसरण झाली आहे.

आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button