
राजकीय उलथापालथ; बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
गुलाबराव देवकर गटाला धक्का; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर येथे पक्षप्रवेश
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात रविवारी मोठी खळबळ उडाली असून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या डॉ. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीणसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी, २४ मे रोजी जामनेर येथे हा पक्षप्रवेश पार पडला. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास डॉ. अरुण पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नुकतीच बिनविरोध निवड झालेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर हेही उपस्थित होते.
बाजार समितीच्या राजकारणाला नवी कलाटणी
डॉ. अरुण पाटील यांच्या या निर्णयामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीच्या राजकारणात आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता बाजार समितीत भाजपचा प्रभाव आणि वर्चस्व आणखी मजबूत होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, देवकर गटाचे विश्वासू मानले जाणारे डॉ. अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा गुलाबराव देवकर गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रभावामुळे या पक्षप्रवेशाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हसावद गटात भाजपची ताकद वाढणार?
दरम्यान, डॉ. अरुण पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील म्हसावद गटात भाजपचे प्राबल्य आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून विरोधकांसाठी तो धोक्याची घंटा ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.




