
जळगावात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलची ऑर्थोपेडिक ओपीडी सुरू
उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक अस्थिरोग उपचारांचा लाभ
जळगाव प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक अस्थिरोग उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांनी जळगाव येथे ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडीची सुरुवात केली आहे. या ओपीडीचे उद्घाटन १६ जून रोजी रिंग रोडवरील पियुष हॉस्पिटल येथे करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर हे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत जळगाव येथे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
या विशेष ओपीडीच्या माध्यमातून हाडांचे विविध आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खांद्याच्या समस्या, कूल्हा व गुडघा प्रत्यारोपण, क्रीडाजन्य दुखापती तसेच अन्य अस्थिरोगांवरील आधुनिक उपचारांबाबत रुग्णांना तज्ज्ञ सल्ला व उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या सुविधेमुळे जळगावसह परिसरातील रुग्णांना उपचारांसाठी नाशिक किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा त्यांच्या शहरातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.





