अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरणगाव येथे सरकारी योजनांच्या जनजागृती शिबिराचे आयोजन

अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरणगाव येथे सरकारी योजनांच्या जनजागृती शिबिराचे आयोजन
वरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील सामाजिक संस्था अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वरणगाव (ता. भुसावळ) येथील अक्सा नगर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या जनजागृतीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिक, महिला व बांधकाम कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच आरोग्यविषयक योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी बांधकाम मंडळाशी संलग्न डॉक्टर समीर व डॉक्टर विश्वजीत यांनी मजुरांची आरोग्य तपासणी केली. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या ५५ मोफत वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
तसेच ज्या बांधकाम कामगारांची अद्याप मंडळाकडे नोंदणी झालेली नव्हती, त्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीला एक वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांचे मजूर कार्ड नूतनीकरणही करण्यात आले. महिलांसाठी शासनाने सुरू केलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी बोलताना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी सांगितले की, शासनामार्फत अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात; मात्र माहितीअभावी अनेक नागरिक त्या योजनांपासून वंचित राहतात. ही दरी कमी करण्यासाठी अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिबिरात वरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक अशपाक शाह, नगरसेविका प्रतिनिधी इरफान सय्यद (मिर्झा), अमन सोसायटीचे अध्यक्ष अमनोद्दीन शेख सलाउद्दीन, सचिव झहीर खान, जाकीर शाह, सामाजिक कार्यकर्ते इम्रान शाह तसेच मौलाना शफीक आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ शाह, जाकीर शाह, खालिद साबीर शाह, रेहान फारूक शाह, मुजाहिद कुरेशी, उजेर शेख, जुनेद अहमद यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वरणगाव येथील अमन बहुउद्देशीय संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





