
खाकीचा दणका! जळगावात घरफोडी करणारे दोन अट्टल चोर अवघ्या ५ तासांत जेरबंद
गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी; ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या पाच तासांत दोन अट्टल चोरांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला ६३ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ जून रोजी रात्री १० ते दि. २६ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान शिवाजीनगरातील भगतसिंग चौक परिसरातील रहिवासी सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घरातून एक डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाला तपासासाठी रवाना केले.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरातील राफत शेख फिरोज (वय २०) आणि शिवाजीनगर हुडको येथील शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही चोरीची कबुली दिली.
आरोपींकडून डेल कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग आणि नोकिया कंपनीचे मोबाईल, पितळी कळशी तसेच रोख रक्कम असा चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील पाटील, दीपक शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील तसेच पोलीस कर्मचारी अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांच्या पथकाने केली.
अवघ्या पाच तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना गजाआड करणाऱ्या जळगाव शहर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




