खान्देशगुन्हेजळगांव

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १५.४० लाखांची फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १५.४० लाखांची फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी : ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल १५ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून “SBI Securities Back End Trading System” मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक आणि ऑनलाइन माध्यमांचा वापर करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर “ब्लॉक ट्रेडिंग” मध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला देत वेळोवेळी रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी ऑनलाइन पद्धतीने एकूण १५ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जमा केली. मात्र, गुंतवणुकीवरील नफा किंवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनकडून सुरू असून नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणूक, ट्रेडिंग किंवा जास्त परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित संस्था व प्लॅटफॉर्मची खातरजमा करावी, तसेच संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेजपासून सावध राहावे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button