खान्देशगुन्हेजळगांव

डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी; नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक

अवघ्या ७ मिनिटांच्या प्रतिसाद वेळेसह आपत्कालीन सेवेत जळगाव जिल्हा अव्वल !

डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी; नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक
अवघ्या ७ मिनिटांच्या प्रतिसाद वेळेसह आपत्कालीन सेवेत जळगाव जिल्हा अव्वल !

जळगाव | प्रतिनिधी

डायल ११२ आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने जळगाव पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत जून २०२६ महिन्यात नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या ७ मिनिटांच्या Final Response Timing सह जळगाव पोलिसांनी सर्व जिल्ह्यांना मागे टाकत आपत्कालीन सेवेमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

जून २०२६ दरम्यान जळगाव जिल्ह्यातून डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर २ हजार ८४८ कॉल्स प्राप्त झाले. प्रत्येक घटनेवर तातडीने प्रतिसाद देत पोलीस यंत्रणेने नागरिकांना शक्य तितक्या कमी वेळेत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्याने नाशिक परिक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

नाशिक परिक्षेत्रातील जिल्हानिहाय Final Response Timing

  • जळगाव : ७ मिनिटे
  • नंदुरबार : ८ मिनिटे ३३ सेकंद
  • धुळे : ८ मिनिटे ३९ सेकंद
  • नाशिक ग्रामीण : १० मिनिटे ०९ सेकंद
  • अहिल्यानगर : १४ मिनिटे १९ सेकंद

या आकडेवारीवरून जळगाव पोलिसांचा प्रतिसाद सर्वाधिक वेगवान असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एसपी श्रीकांत धिवरे यांच्या प्रभावी नियोजनाची छाप

या यशामागे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डायल ११२ व्यवस्थेचा घेतलेला सखोल आढावा आणि दिलेल्या प्रभावी सूचनांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्यांनी नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे आणि प्रतिसाद पथकांमध्ये अधिक समन्वय ठेवण्यावर भर दिला. प्रत्येक आपत्कालीन कॉलला प्राधान्याने प्रतिसाद देण्याचे आणि घटनास्थळी शक्य तितक्या कमी वेळेत पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते.

या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करत प्रत्येक आपत्कालीन कॉलवर तात्काळ प्रतिसाद दिला. परिणामी अनेक नागरिकांना वेळेत मदत मिळाली आणि पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.

नागरिकांसाठी जीवनदायी सेवा

डायल ११२ ही सेवा अपघात, गुन्हे, महिला सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, सार्वजनिक सुव्यवस्था तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तातडीची मदत मिळवून देणारी महत्त्वाची यंत्रणा आहे.

जून २०२६ मधील ही उल्लेखनीय कामगिरी जळगाव पोलीस दलाच्या प्रतिमेत आणखी भर घालणारी ठरली असून, नागरिकांप्रती असलेली तत्परता, शिस्तबद्ध नियोजन आणि कार्यक्षम पोलीस यंत्रणेचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. भविष्यातही अधिक जलद, प्रभावी आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या जळगाव पोलिसांच्या वचनबद्धतेची ही प्रचिती असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button