खान्देशगुन्हेजळगांव

अमळनेरात एलसीबीची पहाटे धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तलीवर मोठी कारवाई

दोन ठिकाणी एकाचवेळी छापे; ११ जण ताब्यात, ६ फरार; ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेरात एलसीबीची पहाटे धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तलीवर मोठी कारवाई

दोन ठिकाणी एकाचवेळी छापे; ११ जण ताब्यात, ६ फरार; ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर | प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शुक्रवारी पहाटे अमळनेर शहरातील पारधीवाडा आणि जपान जिन परिसरात एकाचवेळी धडक छापेमारी करून कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सहा संशयित घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे तसेच अन्य साहित्य जप्त केले असून तीन जिवंत बैलांची सुटका करून त्यांना गोशाळेत हलविण्यात आले आहे.

सकाळी ६ ते १२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पारधीवाडा परिसरातून हसनखान गुलाबखान पठाण, मोहसीनखान हसनखान पठाण, फराजखान हमीदखान कुरेशी, अर्षदखान अजीजखान कुरेशी, रियाज अहमद अब्दुल शकूर कुरेशी, तन्वीर शेख ताहेर कुरेशी, जावेदखान सुलेमानखान कुरेशी, अब्दुल शेख नुरा कुरेशी, अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी आणि शरीफ शेख अकबर कुरेशी या ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी आणि शरीफ खान मजीदखान कुरेशी हे संशयित पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

छापेमारीत विविध वयोगटातील गोवंशाचे सुमारे १ हजार ५७५ किलो मांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजित किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ लोखंडी सुऱ्या, सहा लोखंडी कोयते, दोन वजनकाटे व मापे असा कत्तलीसाठी वापरला जाणारा साहित्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त साहित्याची किंमत सुमारे ३ लाख १८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान जावेदखान कुरेशी याच्या जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन देशी बैल जिवंत अवस्थेत आढळून आले. सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या या जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत दाखल करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांच्या उपस्थितीत जप्त मांसाचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आले, तर उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button