
बंदुकीचा धाक दाखवत मध्यरात्री तरुणांची लूट; दोन संशयित जेरबंद
भुसावळच्या खडका ब्रिजजवळ थरार; ११ हजार ८०० रुपयांची रोकड हिसकावली, इतरांचा शोध सुरू
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील खडका ब्रिज परिसरात मध्यरात्री दोन तरुणांना अडवून चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करून ११ हजार ८०० रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश दीपक तायडे (वय २५, रा. कंडारी, ता. भुसावळ) हे ८ जुलै रोजी मध्यरात्री मित्रासह घरी जात असताना खडका ब्रिज परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. संशयितांनी चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली.
या घटनेत फिर्यादीकडील ११ हजार रुपये आणि त्यांच्या मित्राकडील ८०० रुपये, असा एकूण ११ हजार ८०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
तातडीने कारवाई; दोघे अटकेत
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केशव सुनील भालेराव (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) आणि खुशाल शिवदास रुम (वय २०, रा. गडकरी नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.





