
वरणगावातून सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला !
कारसह एकजण ताब्यात
वरणगाव: महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला ५ लाख १७ हजार ८६८ रुपये किमतीचा गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा वरणगाव पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून या बेकायदेशीर मुद्देमालाची वाहतूक केली जात असताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री सुमारे सव्वाआठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मुक्ताईनगर ते भुसावळ मार्गावरील कपीलवस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित इनोव्हा कार (क्र. एमएच-२० बीडी-३०००) त्या भागातून जात असताना पोलीस व पथकाने तिची अडवून पाहणी केली. वाहनाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस पूर्णपणे बंदी असलेला विविध कंपन्यांचा गुटखा, केसरयुक्त विमल पानमसाला आणि इतर मानवी आरोग्यास घातक असणारे तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी विंग तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, करमचंद प्रीमियम पानमसाला आणि केसी-१००० या तंबाखूजन्य पदार्थांच्या गोण्यांसह वाहतुकीचे साधन असलेली कार असा एकूण ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार पुढील कायदेशीर विश्लेषणासाठी व तपासासाठी जप्त साठ्यातून प्रत्येक प्रकारातील नमुने घेण्यात आले आहेत.
या गैरकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी करत आहेत.





