इतरखान्देशगुन्हेजळगांव

दोन दिवसांपूर्वीच्या वादाचा बदला; दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला

दोन दिवसांपूर्वीच्या वादाचा बदला; दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला

अयोध्यानगरात शाळेपासून अवघ्या १०० मीटरवर थरार; बरगडीत वार, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू

जळगाव : दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच वर्गातील विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी अयोध्यानगर परिसरात घडली. बीयूएन रायसोनी शाळेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर झालेल्या या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीत चॉपरचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी वर्गात झाला होता वाद

जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वर्गात असताना संबंधित विद्यार्थ्याने मुलाच्या पायांत पाय अडकवून त्याला खाली पाडले होते. या प्रकारानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन्ही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज दिली होती. तसेच संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून काढण्याची कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

मागून येत चॉपरने केला वार

शुक्रवारी सकाळी क्लास संपल्यानंतर जखमी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच वर्गातील एक अल्पवयीन विद्यार्थी मागून चॉपर घेऊन आला. त्याने जखमी विद्यार्थ्याच्या बरगडीच्या भागात चॉपरने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

यानंतर जखमीचे वडील रुग्णालयात पोहोचले. पुढील उपचारासाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांकडून चौकशी

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी विद्यार्थ्याकडून घटनेची माहिती घेतली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

विद्यार्थ्यांमधील वादाचे हिंसक रूप

जळगाव शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादांना हिंसक वळण मिळण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. क्रिकेट सामन्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना यापूर्वी घडली होती.

दरम्यान, ज्या शाळेत शुक्रवारच्या घटनेतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्याच शाळेतील एका विद्यार्थ्याच्या दप्तरात पिस्तूल सापडल्याची माहितीही जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दप्तर तपासणीसह कडक कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शाळा प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे. शाळेच्या आवारात तसेच परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button