खान्देशजळगांव

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

जळगाव : महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव येथे जुनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून १३, १५ व १७ वर्षांखालील मुला-मुलींचा सहभाग असून, जवळपास पावणेदोनशे खेळाडूंसह सुमारे ५० प्रशिक्षक, व्यवस्थापक व पदाधिकारी जळगावात दाखल झाले आहेत.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात १५ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान जळगाव संघाने संभाजीनगर संघाचा ७१-१९ असा ५२ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. घरच्या मैदानावर खेळताना जळगावच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व राखले.

जळगावकडून मनीष परदेशी याने १४ धावा करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली. योगेंद्र भोळे याने १४ धावा करण्याबरोबरच एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली. कार्तिकने ९ धावा करत एक बळी घेतला. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर जळगावने भक्कम धावसंख्या उभारली. संभाजीनगरकडून आर्यन पांडे याने ६ धावा व एक बळी घेत चांगला प्रयत्न केला, तर ओम राऊत व इम्रान शेख यांनी प्रत्येकी ६ धावा केल्या. मात्र जळगावच्या गोलंदाजीसमोर संभाजीनगरचा डाव १९ धावांवर आटोपला.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य अजिंक्यपदाबरोबरच युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, पुढील निवडीतून पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड इनडोअर क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

जळगावसह ठाणे, संभाजीनगर, बीड, सातारा, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जळगावमध्ये प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आयोजकांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी दीपक आर्डे, किशोर चौधरी, देवदत्त पाटील, नगरसेवक निलेश तावडे, सागर पाटील, निखील पाटील यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितीज वेदक, संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब (बाळ) तोरसकर तसेच राजेंद्र इखनकर यांचे स्पर्धेला मार्गदर्शन लाभत आहे.

गुणवंत खेळाडूंची निवड करण्यासाठी वैशाली भिडे-बर्वे, ओमकार पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांची निवड समिती काम पाहत आहे. खेळाडूंचे कौशल्य, सातत्य आणि सामन्यातील कामगिरीच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच स्पर्धेतील सामने सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नामदेव हटकर, राकेश भालेराव, सुशांत जाधव, सचिन सोनावणे, क्षितीज सोनावणे व सुजर वराडे पंच म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पहिल्याच सामन्यात मिळविलेल्या मोठ्या विजयामुळे यजमान जळगाव संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आगामी सामन्यांत संघाची कामगिरी कशी राहते याकडे जळगावातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जळगावसह महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना इनडोअर क्रिकेटमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button