
रावेर तालुक्यातील जि.प. शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राची करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी
जळगाव/प्रतिनिधी (दि. २० ऑगस्ट २०२६) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वाघोदे व मस्कावद येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. तसेच चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्यविषयक सुविधा, स्वच्छता व औषधसाठ्याचा आढावा घेतला.
रावेर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सर्वप्रथम वाघोदे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून निपुण भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना थेट विविध प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणीही त्यांनी केली.
त्यानंतर त्यांनी मस्कावद येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून माहिती घेतली. तसेच शाळेचा परिसर व आवाराची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी शिजविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या किचन शेडचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक बाबींची माहिती घेतली.
याच दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. आरोग्य केंद्राच्या परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. केंद्रातील औषधसाठ्याचीही त्यांनी माहिती घेतली.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा तसेच रुग्णांना आरोग्य सेवा देताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी संबंधितांना दिले.





