खान्देशगुन्हेजळगांव

शेळगावात अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांची कारवाई

शेळगावात अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांची कारवाई

२५ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी : शेळगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत तब्बल २५ ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक व नदीपात्रालगत वाळूचा साठा करणाऱ्या एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोलिंगदरम्यान ट्रॅक्टर आढळले

दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक शेळगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवाना अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत.

तापी नदीपात्राजवळ वाळूचा अवैध साठा

चालकाची अधिक चौकशी केली असता त्याने शेळगावकडील तापी नदीपात्राजवळील गायरान जागेत स्वतःसह साथीदारांनी वाळूचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाळू अवैधरित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे २५ ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४,०६,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात अवैध वाळू वाहतूक तसेच नदीपात्रालगत वाळूचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे सफौ/१६३ संजय महाजन करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली.

कारवाईत पोहेकॉ गुणवंत देशमुख, गिरीष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे तसेच चासफौ रियाजोद्दीन काझी यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारची अवैध वाळू वाहतूक किंवा साठा निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने नशिराबाद पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button