

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची नियोजन बैठक उत्साहात
शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्तम नियोजनातून उत्सव साजरा करण्याचा संकल्प
जळगाव | प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण उत्सव नियोजन बैठक सोमवारी (२४ ऑगस्ट) गायत्री मंदिर सभागृहात उत्साहात पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशभक्तांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्री गणेश मंत्राने बैठकीची सुरुवात करण्यात आली.
श्री गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी येणाऱ्या अडचणी, आवश्यक परवानग्या आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नवीन गणेशोत्सव मंडळांना परवानगी प्रक्रियेची माहिती देऊन उत्सव काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
आगमन मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी
गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गावर असलेल्या खड्ड्यांचा मुद्दा बैठकीत प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. रिंगरोडवरील मूर्ती कारखाना ते गोकुळ स्वीट चौक या मार्गासह शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने गणेशमूर्ती आगमनादरम्यान अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आगमन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
महावितरण, आरोग्य व स्वच्छता विभागाला आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन महावितरण, महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाला करण्यात आले. उत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
येत्या काळात गणेशोत्सवाच्या तयारीचा पुढील आढावा घेण्यासाठी आणखी बैठका घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा अधिक भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी मंडळांनी शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्याचा संकल्प केला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
बैठकीला महामंडळाचे पदाधिकारी, समन्वयक सूरज दायमा, किशोर भोसले, मुनेश बारी, किशोर देशमुख, अमोल धांडे, विनय बाहेती, राकेश तिवारी, राहुल परकाळे, धनंजय चौधरी, रिंकू चौधरी, विनोद अनपट, चेतन पाटील, अजय बत्तीसे, राहुल सनकत, विकास चौधरी, चेतन सुतार, धीरज पुरोहित, अविनाश भोई, रितेश चौधरी, राहुल पाटील, शुभम विंचूरकर, अमर राजपूत, कौशल भोसले, भगवान कोळी, मनोज सपकाळे, कार्तिक कुलकर्णी, चेतन नाथजोगी, नितीन कोल्हे, आदित्य कुकरेजा, मीनल पाटील, गणेश आंबोरे, बबलू भोई, नितीन चौधरी, अनुराग सोनार, विजय जाधव, हितेश वाणी, नरेंद्र पाटील, अर्पित भावसार, वैभव जगदाळे, राहुल भोई, पिंटू तापडिया, करण साखला यांच्यासह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




