इतर

रावेर पोलिसांची कारवाई; मुलीला घेऊन आलेल्या २३ वर्षीय तरुणासह दोन्ही आरोपी ताब्यात

अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

रावेर पोलिसांची कारवाई; मुलीला घेऊन आलेल्या २३ वर्षीय तरुणासह दोन्ही आरोपी ताब्यात

रावेर : प्रतिनिधी — सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू असताना सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलीला कोणतीही नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी लॉजिंग मॅनेजरसह दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

तपासणीदरम्यान प्रकार उघडकीस

दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नितीन सुभाष महाजन (वय २३, रा. वाघोड, ता. रावेर) हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘फ्रेश होण्यासाठी’ वैशाली लॉजिंग येथे घेऊन आला होता. सणानिमित्त रावेर पोलिसांकडून हॉटेल व लॉजिंगची तपासणी केली जात असताना हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.

ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद नाही

पोलिसांच्या माहितीनुसार, वैशाली लॉजिंगचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (वय ४३, रा. अजंदा, ता. रावेर) याने कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच लॉजिंगच्या रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद न करता रूम उपलब्ध करून दिली. तसेच संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असतानाही ती लपवून ठेवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मॅनेजरविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल

रावेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(l), ३५१(२)(३) तसेच POCSO अधिनियम २०१२ मधील कलम ४, १६ व २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्याची माहिती न देणे किंवा लपविणे याबाबतही POCSO कायद्यात तरतूद आहे.

पोलिसांची तत्पर कारवाई

सदर गुन्हा पोहेकॉ नितीन आमोदकर यांनी तात्काळ दाखल करून घेतला. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत.

बेकायदेशीर पद्धतीने लॉजिंगमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या चालक-मालकांवर तसेच गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर जळगाव पोलीस कठोर कारवाई करतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button