

वैद्यकीय बिलाची रक्कम जमा करण्यासाठी २ हजारांची लाच; वरिष्ठ सहाय्यकाला ७ वर्षांनंतर शिक्षा
लाचलुचपत प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; कलम ७ अंतर्गत ६ महिने, तर कलम १३(२) अंतर्गत १ वर्ष कारावास
नाशिक : शासनाकडून मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. रामचंद्र नरसु माकरे, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक असे आरोपीचे नाव आहे.
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांनी आरोपी माकरे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत ६ महिने कारावास आणि १ हजार रुपये दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १ महिना साधा कारावास, तसेच कलम १३(२) अंतर्गत १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२०१४ मध्ये २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
तक्रारदाराचे शासनाकडून मंजूर झालेले वैद्यकीय बिलाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आरोपी रामचंद्र माकरे यांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक येथील वैद्यकीय खर्च प्रतिकृती कक्षासमोरील हॉलमध्ये आरोपीने तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा क्रमांक ३०६९/२०१४ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे १६ सप्टेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
२०१५ मध्ये दोषारोपपत्र; आता न्यायालयाचा निकाल
सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपासी अधिकाऱ्यांनी ९ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची स्पेशल केस क्रमांक १९/२०१५ अशी होती.
दीर्घ सुनावणीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी रामचंद्र नरसु माकरे यांना दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
एसीबी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या खटल्याच्या कामकाजात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप काळोगे यांनी कामकाज पाहिले.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे आणि सचिन गोरवाडकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
लाचेची मागणी झाल्यास १०६४ वर तक्रार करा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणताही खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टोल फ्री हेल्पलाइन : १०६४
नागरिकांना लाचेची मागणी, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची कार्यपद्धती किंवा तक्रार नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधता येईल.




