खान्देशजळगांवसामाजिक

क्रिकेट फिव्हर ऑन! जळगाव क्रिकेट लीगचा आज दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ

क्रिकेट फिव्हर ऑन! जळगाव क्रिकेट लीगचा आज दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ

​जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर रंगणार महा-थरार; मंत्र्यांसह दिग्गज राहणार उपस्थित

​जळगाव | प्रतिनिधी
जळगावकरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या क्रिकेटचा महाकुंभ अर्थात ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) उद्यापासून मेहरूण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर रंगणार आहे. १८ ते २६ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या टी-२० स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जळगावकर सज्ज झाले असून, शनिवारी सायंकाळी भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

​याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, अनिल भाईदास पाटील, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्यासोबत असोसिएशनचे पदाधिकारी एस. टी. खैरनार, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, जेसीएल व्यवस्थापनाचे सुयूश बुरकूल, अभंग जैन आणि बीसीसीआयचे विविध पंच उपस्थित राहणार आहेत.

सहा टीम आणि १०८ खेळाडूंचा सहभाग

आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत आहेत. यात जळगाव कोगटा किंग (आयकॉन: जगदीश झोपे), जामनेर सातपुडा हिरोज (आयकॉन: शतायू कुलकर्णी), पाचोरा एसकेटी योद्धाज (आयकॉन: सचिन चौधरी), चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स (आयकॉन: ओम मुंडे), रावेर रॉयल्स (आयकॉन: धवल हेमनानी) आणि अमळनेर सुहास जायंट्स (आयकॉन: शुभम शर्मा) या संघांमधील १०८ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांशी पाच सामने खेळेल, त्यानंतर क्वालिफायर आणि एलिमिनेटर फेऱ्या होऊन २६ एप्रिल रोजी ग्रँड फायनल रंगणार आहे.

स्टेडियमला लाभला मेट्रो सिटीचा लूक

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित या स्पर्धेसाठी जैन ड्रीम स्पेसेसचे मैदान एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे सजले आहे. मैदानावर ट्रफ विकेट, हिरवळीचे लॉन आणि बाउंड्रीवर आकर्षक एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या सामन्यांसाठी विशेष एलईडी लाईट्सची सोय करण्यात आली असून, प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही गॅलरी सर्व क्रीडाप्रेमींसाठी खुली राहणार आहे.

आजचे सामने

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १८ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज असा पहिला सामना रंगेल. तर सायंकाळी ७:३० वाजता चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळणार आहे. एकूण १९ सामन्यांच्या या मालिकेत चौकार, षटकारांसह गुगली आणि यॉर्करची मेजवानी जळगावकरांना अनुभवता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button