इतर

बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या दप्तराची होणार सखोल चौकशी

बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या दप्तराची होणार सखोल चौकशी

सीइओ करिश्मा नायर यांची अचानक भेट; प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्याने चौकशीचे आदेश

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील ग्रामपंचायतीस अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करताना प्रथमदर्शनी काही अनियमितता आढळून आल्याने संबंधित दप्तराची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर या धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध अभिलेखांची व दप्तरांची तपासणी केली. तपासणीदरम्यान प्रथमदर्शनी काही बाबींमध्ये अनियमितता निदर्शनास आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
याच दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील स्वच्छता, परिसराची देखभाल तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या शैक्षणिक सुविधांची पाहणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिकविण्यात येत असलेल्या विविध विषयांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेबाबत त्यांनी शिक्षकांशीही चर्चा केली. यावेळी उपस्थित शिक्षकांना ‘निपुण ॲप’चा काळजीपूर्वक व प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच निपुण अभियानांतर्गत असलेल्या छोट्या-छोट्या बाबींवरही विशेष लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती घेतली. घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने, गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे तसेच धरणगावचे गटविकास अधिकारी सागर कोल्हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button