
शिक्षणातूनच देशाची उभारणी शक्य ; रावेरमध्ये सिदरा फाउंडेशन व अल हुदा एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीचा शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा उत्साहात
डॉ. मुबारक कापडी, सुहैल अमीर शेख आणि डॉ. अब्दुल करीम सालार यांचे मार्गदर्शन

रावेर, प्रतिनिधी : शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून देशाची उभारणी, नव्या पिढीची वैचारिक व नैतिक जडणघडण आणि समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञांनी केले. सिदरा फाउंडेशन आणि अल हुदा एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथील मदिना कॉलनीतील डी. एम. हॉलमध्ये आयोजित शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्यात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज मुदस्सर यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. मुंबई येथील सय्यद शरीफ यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांचा विकास घडवण्यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
### नव्या पिढीच्या जडणघडणीसाठी शिक्षणाला उद्देश हवा
प्रमुख अतिथी सुहैल अमीर शेख (जळगाव) यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, जागरूक, कुशल, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे माध्यम म्हणून पाहण्याचे आवाहन केले. देशाच्या आणि समाजाच्या उभारणीत योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांसोबतच वैचारिक प्रगल्भता, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीकडे लक्ष द्यावे, तर पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रवासात सक्रिय सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना सामाजिक समस्यांची जाणीव आणि त्या सोडवण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे, असेही सुहैल अमीर शेख यांनी सांगितले.
### एक वेळ उपाशी राहा; पण मुलांचे शिक्षण थांबू देऊ नका!
मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मुबारक कापडी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. शिक्षण हे केवळ व्यक्तीच्या प्रगतीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या भविष्यनिर्मितीचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आपण एक वेळचे जेवण केले आणि दुसऱ्या वेळेस उपाशी राहिलो, तरी चालेल; परंतु आपल्या मुलांना शिक्षणाने समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे आवाहन डॉ. कापडी यांनी केले. आर्थिक अडचणींमुळे मुलांचे शिक्षण थांबता कामा नये. उपलब्ध साधनांचा योग्य वापर, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
महिला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना मुली आणि महिलांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन व संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखावेत, पालकांनी त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे आणि शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार वातावरण निर्माण करावे, असेही त्यांनी नमूद केले.
### मार्गदर्शन मेळाव्यांची मालिका सुरू ठेवण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार (जळगाव) यांनी अध्यक्षीय मनोगतात अशा शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्यांची मालिका सातत्याने सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. शैक्षणिक जागृती एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
### मान्यवरांची उपस्थिती; आयोजकांचे योगदान
मेळाव्याला डॉ. मुबारक कापडी (मुंबई), डॉ. अब्दुल करीम सालार आणि सुहैल अमीर शेख (जळगाव) यांच्यासह सय्यद शरीफ, रईस सर, शेर अफगन, हयात सेठ, अहमद सर (केंद्रप्रमुख), शेख आबिद मोहम्मद आणि इरफान सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रईस सर यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शफीउद्दीन सर, वसीम डॉक्टर, अल्तमश शेख, मुश्ताक सर, झुलकर्नैन आणि इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडवणे, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे आणि सामाजिक प्रगतीला चालना देणे, हा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या उभारणीला अधिक बळ मिळू शकते, असा सूर या कार्यक्रमातून व्यक्त झाला.




