
सहा तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; सराईत चोरटा जेरबंद!
जळगाव शहर पोलिसांची कारवाई; २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, निसार कॉलनीतील चोरीप्रकरणी आरोपीला अटक

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सक्रिय झालेल्या जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निसार कॉलनी परिसरातील घरफोडी करून चांदीचे पैंजण, सोन्याच्या पोती आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले. अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. असमतखा इलियास खा कुरेशी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
निसार कॉलनीत घरफोडी
जळगाव शहरातील निसार कॉलनी, गट क्रमांक ३४७/२, प्लॉट क्रमांक २७/२ येथे राहणारे शेख अनिस शेख चाँद (वय ३५, व्यवसाय मोबाईल रिपेअरिंग) यांच्या घरात ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरातून सुमारे १७ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पोती, ज्यांची किंमत आठ हजार रुपये, तसेच चार हजार रुपये रोख असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध
जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनीही जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने निसार कॉलनीतील घरफोडीचा तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकातील अंमलदार गेंदालाल मिल परिसरात संशयिताचा शोध घेत होते. त्याचवेळी गुप्त बातमीदाराकडून असमतखा इलियास खा कुरेशी याने चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता तो रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला.
चौकशीत गुन्ह्याची कबुली; मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील GPSI सुनील पाटील, सहायक फौजदार दीपक शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




