
कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह
पाळधीतील स्नेहल इंडस्ट्रीजमधील घटना; मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगाव, प्रतिनिधी :
जळगाव शहरातील महाबळ कॉलनीत वास्तव्यास असलेल्या अरविंद श्यामराव पाटील (वय ४५) या कामगाराचा मृतदेह पाळधी येथील स्नेहल इंडस्ट्रीज कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवारी (ता. २७) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी पाळधी पोलिस दूरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरविंद पाटील हे स्नेहल इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. मात्र, कंपनीत कामावर हजर होण्याऐवजी कंपनीबाहेरील झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले.
सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अरविंद पाटील यांना खाली उतरवून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
अरविंद पाटील हे स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलिस तपासातून त्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.




