
पिंप्राळा स्मशानभूमीचा प्रस्ताव द्या, तत्काळ मंजुरी देऊ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
पिंप्राळा–निमखेडीतील रस्ते व गटारींच्या कामांचे भूमिपूजन; दर्जेदार कामांसाठी निर्देश

जळगाव, प्रतिनिधी :
पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच नागरिकांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधान व्यक्त करताना, रस्त्यांची कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ व १० मधील पिंप्राळा–निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. २१) उत्साहात पार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला.
मागील भेटीत या परिसरातील रस्त्याचे काम मंजूर करून देण्याचा शब्द नागरिकांना दिला होता. आज त्याच कामाचे भूमिपूजन करताना मनापासून समाधान वाटत आहे. लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून, दिलेला शब्द पाळण्यातच लोकप्रतिनिधी म्हणून खरे समाधान आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. रस्त्यांचे काम करताना गुणवत्तेशी तडजोड करू नये आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मागील वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या कामांना मंजुरी दिली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ तसेच महापौर व उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
शहराचा विकास टप्प्याटप्प्याने करणार : आ. राजूमामा भोळे
रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजूमामा भोळे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. सध्या दुष्काळाची परिस्थिती असली, तरी उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार शहरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले, तर आभार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मानले.
या वेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य तथा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, अरविंद देशमुख, कुंदन काळे, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे व जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे, स्थानिक पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.




