खान्देशजळगांवसामाजिक

बियाणी मिलिटरी स्कूलच्या अनधिकृत बांधकामाबाबत  नोटीस

बियाणी मिलिटरी स्कूलच्या अनधिकृत बांधकामाबाबत  नोटीस

सात दिवसांत कागदपत्रांसह खुलासा सादर करण्याचे निर्देश; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण येथील बियाणी मिलिटरी स्कूलच्या कथित अनधिकृत बांधकाम व शैक्षणिक वापराप्रकरणी कांताबाई बन्सीलाल बियाणी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.

मिरगव्हाण येथील गट क्रमांक ९६/१, ९६/२ आणि ९६/३ या जमिनींचा वापर रहिवासासाठी असताना, आवश्यक परवानग्यांशिवाय बियाणी मिलिटरी स्कूलचे बांधकाम करण्यात आले असून, त्या ठिकाणी शैक्षणिक वापर सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणी संबंधित बांधकाम व शैक्षणिक वापर तातडीने निष्कासित का करण्यात येऊ नये, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत नोटिशीत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश

नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा, जबाब, मूळ कागदपत्रे आणि आवश्यक परवानग्यांच्या प्रतींसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधितांना या प्रकरणात काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या नोटिशीमुळे बियाणी मिलिटरी स्कूलच्या बांधकाम व वापरासंदर्भातील प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले असून, संबंधितांकडून काय खुलासा सादर केला जातो आणि प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button