इतर

नवरात्र म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि विधी

खान्देश टाइम्स न्यूज | १५ ऑक्टोबर २०२३ | आज आपण पाहणार आहोत नवरात्री व्रता विषयी ! हि माहिती आज देत आहे कारण ज्यांना या व्रताची माहिती नसते त्यांच्या पर्यंत आजच्या दिवसात हि माहिती पोहचेल व भाग्यालीखीत परिवारातील प्रत्येकाला हे व्रत करता येईल म्हणूनच हा लेख आवडला तर आपल्या मित्रांना पण जरूर शेअर करा !

१} नवरात्र म्हणजे काय ? त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात ?
अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्या होणार्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव
चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात
त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.

२} नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ? त्यासाठी काय काय करावे ?
नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ? ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे. कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर बारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे.

३} वेदिका म्हणजे काय ?
वेदिका म्हणजे शेत. शेतीतील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर लांबरूंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदिच्या पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग) पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामः””वेदिकायैनमः” म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. ” सप्तधान्येभ्योनमः” असे म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावीमः”” पर्जन्यायनमः” म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरूण देवतेची स्थापना करावी. काही जण वरूण ( कलश ) मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काहीजण नारळ ठेवतात. तर काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दिपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी जडधातूची समई किंवा नंदादीप वापरावा.

भोदीप देवी रुपस्त्वं कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |
यावन्नवरात्रसामप्ति: स्थात्तावत्वं सुस्थिरोभव ||

अशी प्रार्थना करून दीप लावावा. यासाठी दोन समयांची योजना करावी. त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू रहाते. विड्याच्या पानावर कुंकूवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत. सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते. ललिता सहस्त्रनाम : हे वेदातील सत्याला उजागर करते. ह्या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पुजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांच्या इच्छा पुरविल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ॐकाराचा उच्चार करावा. स्त्रीयांनी ॐकाराचा उच्चार न करता पठण करावे.

४} नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?
उपवास ह्याचा अर्थः ‘ उप ‘ म्हणजे जवळ, ‘ वास ‘ म्हणजे रहाणे. भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्याव्यक्तीकडे येतात, तिने ते उपवास करावेत म्हणजेच त्या कुटूंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहीजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण रहावी हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून, खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास, आराधना होत नाही. म्हणून हलके, भाजके अन्न, दुध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बर्याच
बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात. पण तांबूल रजोगुणी आहे. सत्त्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतुत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जिव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्त्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते. ‘ जीवेत शरदः शतम | ‘ म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली असते.

५} व्रताचे नियम काय आहेत ?
जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केशकर्तन करू नये. गादीवर झोपू नये. दुसर्याच्या घरी अंथरूणावर झोपू नये अथवा बसूही नये. पायात चप्पल घालू नये.
पण आजकाल हे शक्य होत नाही. मनशांत ठेवावे. परान्न घेवू नये. उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेवून करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वत:ला काय झेपणार आहे हे पहावे म्हणजे थोडक्यात स्वतःच्य शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडतेय असे आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे, त्याला सतत
प्रार्थना करावी, ‘ हे देवा, हे माझ्याकडून करवून घे ‘ व्रताचा अर्थ समजावून घेवून व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. ” हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे. ” अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते. नवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसर्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच
आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नेवेद्य दुसर्याकडून दाखवून घेवून त्याचे लगेचच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नेवेद्य दाखवु नये. कुमारीपूजा : नवरात्रात कुमारीपूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवस कुमारीकांची पूजा असते. न जमल्यास एक दिवस तरी कुमारीका पूजन करावे. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीला ‘ कुमारीका ‘ म्हणतात. दहावर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरूवात करतो, म्हणून दहाव्या वर्षानंतर कुमारीका नाही. दोन वर्षाची ‘ कुमारी ‘, तीन वर्षाची ‘ त्रिमूर्ती ‘, चार वर्षाची ‘ कल्याणी ‘, पाच वर्षाची ‘ रोहिणी ‘, सहा वर्षांची ‘ कालिका ‘, सात वर्षांची ‘ चंडिका ‘, आठ वर्षांची ‘ शांभवी ‘, नऊ वर्षांची ‘ दुर्गा ‘, व दहा वर्षांची ‘ सुभद्रा ‘ अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेवून तिला आवाहन करावे व तिची पूजा करावी.

६} दुर्गा-सप्तशती :
दुर्गासप्तशती मध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत की, ज्याद्वारे भगवतीला आठविले जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञाजागृत होते. सौंदर्य-लहरी : हे शक्तीस्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य-लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भक्तीयुक्त अंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात.
देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत, किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी आणि संध्याकाळी ही म्हणले जात.

नवरात्रात दररोज विशिष्ठ संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्यायांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केली आहे. ‘ हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस
की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहिसे
होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान
देतेस, तू दारिद्र्य आणि दु:ख दूर करतेस ‘
इत्यादी स्तुतीपर प्रार्थना आहे.
हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.

७} मालाबंधन म्हणजे काय?
नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुसर्या व तिसर्या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीन दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुले ह्यांची माळ करावी. दीपप्रज्वलन : म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही. दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी.

८} फुलोरा म्हणजे काय ?
नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात. हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का? ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेने अर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.

९} होम
नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे, दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीच आपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”, तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी” ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोप आहे. इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.

१० } देवीच्या-सेवा कोणत्या?
श्रीसुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत. आणि खालील सेवा कराव्यात !
अ} कुंकूमार्चन सेवा
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे, त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्य देते. कुंकूमार्चन श्रीयंत्रावर करतात.

ब} तांबूल प्रदान सेवा
देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, खीर, पुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहेत. नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मुळ शक्ती एकत्र येवून, ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झाली. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी दौहित्री पाडवा असतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत
( आईचे वडील ) आणि आजोबांना जावून एक वर्ष झाले असेल अशा तीन वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास ( आईच्या मृत वडीलांस ) आजोबास तर्पण करता येते.
व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मण भोजन करवून श्राद्ध विधीही करता येतो. मात्र वडील गेल्यावर दौहित्र करता येत नाही. नवरात्रात एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास पुढिल वर्षी नवरात्र करायचे नाही असा चुकीचा समज आहे. प्रथम वर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सव महोत्सवपूर्वक साजते करण्याऍवजी धार्मिक
विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा चितपावन कोकणस्थ लोकांचा विधी असतो. हा कुळधर्मापैकी एक विधी आहे. त्यावेळीही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतोच. ती देवता तेथे उपस्थित असते. नवमीला शस्त्रपूजन असते. याचे ऍतिहासिक महत्त्व आहे. विजया दशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो. यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा.

क} सरस्वती-पूजन सेवा
सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवात ‘ रिध्दी सिद्धी ‘ म्हणून मानलेल्या आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्य करवून घेतो. षष्ठी सप्तमिला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसारूढ असल्याने ‘ हंसासारखी सर्वत्र विहार करते पण हंसाला नीरक्षीर विवेक असल्याने ती त्याचा वाहन म्हणून स्विकार करते. नवनव्या प्रांतात जावून नविन नविन प्रज्ञा ती आत्मसात करते.

ड} महालक्ष्मी-पूजन :
अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. ते परमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष्य देणारी म्हणजे तीचे भगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास आहे. त्याठिकाणी कुंकूमार्चन करून श्रीसुक्ताची आवर्तने करतात. जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऍश्वर्य व ज्ञान या स्वरूपात सौभाग्य प्रदान करते. दुर्गा-महाकाली : हे शक्तीचे रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारण केलय. आठ हात, गळ्यात रुद्र माळा, तोडलेल्या हातांचा मेखला असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की, कोणत्याही दिशेने संकटे आली तरी ती थोपवू शकते.
जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवितात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजा स्थानावर जावून तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते.

११} उत्थापन :
आपआपल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात. या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. म्हणजे महिशासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो. गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जावून अभिष्टचिंतन करतो.

सोनेप्रदान :
पराक्रम करायला गेलेल्या देवींचे भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात पण अशी गोष्ट सांगतात, विद्यारण्य स्वामिंनी गायत्री देवीची उपासना केली ती बारा वर्षांच्या नंतर त्यांना दसर्याच्या दिवशी प्रसन्न झाली. तिने सोन्या मोत्याचा वर्षाव केला त्यामध्ये आपट्याची पाने होती. हल्लीच्या कालामानानुसार सुवर्णदान देणे शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण, पराक्रम करून आणल्याने, लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते.

जप :
नवरात्रामध्ये ” जय जगदंब, श्री जगदंब ” असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी, ‘ हे देवी, तू बुद्धी रूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर. 卐
आपण जी व्रते आचरतो, ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रते आचरल्यानंतर सर्व कर्मे श्रीकृष्णार्पण करावीत म्हणजे त्यातील दोषांचे परिमार्जन होते. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पहात असतो. त्यामुळे व्रतारंभ करताना परमेश्वराची शरणागत भावनेने प्रार्थना करावी व शक्तीची प्रार्थना करावी. मन स्थिर ठेवून शांत रहावे. शेवटी अपराधांची क्षमा मागून व्रत सांगता करावी.

🙏नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व🙏
🌺नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.
🔶दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.
🔶दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.
🌺महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),
श्री एकवीरादेवी (कार्ला).
🌺नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.
🌺नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.
🌺नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.
🌺‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.
🔶नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.
🌺प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.
🔶समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).
🌺मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.
🌺मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.
🌺मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.

🌺नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं : आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.

🌺🌺🌺आई_जगदंबेची🌺🌺🌺
अखंड_कृपा आपल्या सग्गळ्यांवर आणि कुटुंबियांवर राहो …. आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी
“श्री आई जगदंबेच्या चरणी ” प्रार्थना!!
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
नाकीचा निर्मळ मोती |
मळवट भाळी रेखिती ||
महाळुंग उजव्या हाती |
शिवलिंग मस्तकावरी ||
आई अंबाबाईचा उदे उदे !!!!!

नवरात्र घटमाळा।
१ ली माळ – विडयाची पाने
२ री माळ – बेल, धोतरा, रुई
३ री माळ – दुर्वा, झेंडु
४ थी माळ – मोगरा, जाई-जुई
५ वी माळ – तुळशी
६ वी माळ – गुलाब, कमळ
७ वी माळ – शेवंती, कृष्णकमळ
८ वी माळ – लाल जास्वंद
९ वी माळ – लिंबू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button